सुधागड तालुक्यात जांभूळपाडा येथे युतीची बैठक; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सुधागड-पाली (गौसखान पठाण) 

सुधागड तालुक्यातील जांभूळपाडा येथील ‘निर्वाणा अलाईव्ह’ येथे भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजितदादा पवार गट) आणि आरपीआय (अ) यांची संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून हजारो संख्येने उपस्थिती होती.

दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष तथा राज्यसभेचे खासदार धैर्यशील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाश देसाई यांच्या नेतृत्वात ही बैठक पार पडली. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची ठरली.

यावेळी नुकतेच शिवसेना (शिंदे गट) पक्षातून भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलेले माजी जिल्हा परिषद सदस्य रवि देशमुख व मिलिंद देशमुख यांनी उपस्थित राहून पक्षाच्या ताकदीत भर घातली. त्यांच्या प्रवेशामुळे भाजप-राष्ट्रवादी-आरपीआय (अ) युतीला स्थानिक पातळीवर अधिक बळकटी मिळणार असल्याचे नेत्यांनी सांगितले.

या बैठकीत कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करून आगामी निवडणुकीत युती उमेदवारांना विजय मिळवून देण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजितदादा पवार गट) आणि आरपीआय (अ) यांचे जिल्हा व तालुका पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नेत्यांनी स्पष्ट केले की देशात, राज्यात आणि आता जिल्ह्यात देखील ही युती भ्रष्टाचारमुक्त प्रशासन देण्यास कटिबद्ध आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत सर्व युती उमेदवारांना विजय मिळवून देऊन जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.

दरम्यान, सुधागड तालुक्यात निवडणुकीचे वातावरण तापले असून या युतीकडून ॲड. नीलिमा पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा म्हणून प्रशासनाचा दांडगा अनुभव, अभ्यासू वृत्ती आणि जनतेशी थेट संवाद साधणारी ओळख – यामुळे त्यांचा प्रचार जोरात सुरू आहे. भाजप जिल्हाध्यक्ष तथा खासदार धैर्यशील पाटील यांच्या पत्नी म्हणून त्यांना राजकीय व प्रशासकीय क्षेत्राचा भक्कम पाया लाभला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *