जिल्हा परिषद व पंचायत समितीचे बिगुल वाजलं;रायगडमध्ये आचारसंहिता लागू

अलिबाग (रत्नाकर पाटील)

प्रदीर्घ कालावधीनंतर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांचा कार्यक्रम अखेर राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी (दि.13) सायंकाळी जाहीर केला. रायगड जिल्हा परिषदेच्या 59, तर पंचायत समितीच्या 118 जागांसाठी ही निवडणूक होणार असून, मतदान गुरुवारी (दि.5) फेब्रुवारी रोजी होणार आहे.

निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. यापूर्वी झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत शेतकरी कामगार पक्ष 23, शिवसेना 18, राष्ट्रवादी काँग्रेस 11, तर काँग्रेस व भाजप प्रत्येकी 3 जागांवर विजयी झाले होते. 22 मार्च 2022 रोजी जिल्हा परिषद सदस्यांचा कार्यकाल संपल्यानंतर जिल्हा परिषद प्रशासकीय राजवटीखाली होती. जवळपास पावणे चार वर्षांनंतर आता पुन्हा लोकप्रतिनिधींची निवड होणार असल्याने राजकीय पक्षांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

निवडणूक कार्यक्रमानुसार, उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया शुक्रवार (दि.16) ते बुधवार (दि.21) जानेवारीदरम्यान होणार आहे. गुरुवारी (दि.22) जानेवारीला अर्जांची छाननी, मंगळवारी (दि.27) जानेवारीला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत असून, त्याच दिवशी दुपारी साडेतीननंतर उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे. अंतिम उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर आठ दिवसांचा प्रचार कालावधी मिळणार आहे. जिल्ह्यातील सुमारे 2,323 मतदान केंद्रांवर एकूण 17 लाख 381 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदानानंतर शनिवारी (दि.7) फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे मिनी विधानसभा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रायगड जिल्हा परिषदेवर लवकरच पुन्हा राजकीय राजवट प्रस्थापित होणार आहे.