राष्ट्रीय युवा दिनानिमित्त अलिबागमध्ये अमली पदार्थमुक्त भारतासाठी भव्य रॅली व पथनाट्य चे आयोजन

अलिबाग (रत्नाकर पाटील)

स्वामी विवेकानंद जयंती व राष्ट्रीय युवा दिनानिमित्त अमली पदार्थमुक्त भारत या उद्देशाने जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगड–अलिबाग यांच्या विद्यमाने अलिबागमध्ये भव्य जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा, अलिबाग येथून झाली, तर रॅलीचा समारोप अलिबाग समुद्रकिनारा येथे करण्यात आला.
या रॅलीमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सेंट मेरी शाळा, अरुणकुमार वैद्य जूनियर कॉलेज, दत्ता पाटील विधी महाविद्यालय, जे. एस. एम .कॉलेज, लोकशिक्षण प्रसारक मंडळ महाविद्यालय चोंढी, शासकीय नर्सिंग कॉलेज, जिल्हा तंबाखू नियंत्रण विभाग, मानसिक आरोग्य विभाग, जिल्हा रुग्णालय रायगड–अलिबाग लायन्स क्लब श्रीबाग, आदी संस्थांचा सक्रिय सहभाग होता. तसेच शिक्षकेतर कर्मचारी, पॅनल वकील, विधी स्वयंसेवक, लोक अभिरक्षक कार्यालयाचे वकील यांची उपस्थिती लाभली.
रॅलीदरम्यान अलिबाग बस स्थानक येथे शासकीय नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी युवकांना होणाऱ्या नशेच्या दुष्परिणामांवर आधारित प्रभावी पथनाट्य सादर केले. या पथनाट्यातून नशेमुळे तरुणांचे आरोग्य, शिक्षण व भविष्य कसे धोक्यात येते, हे वास्तववादी पद्धतीने सादर करण्यात आले.
रॅलीच्या समारोपप्रसंगी अलिबाग समुद्रकिनाऱ्यावर सेंट मेरी कॉन्व्हेंट स्कूलच्या विद्यार्थ्यांनी नशामुक्त भारत विषयावर आणखी एक प्रभावी पथनाट्य सादर करून अमली पदार्थांचे दुष्परिणाम समाजासमोर ठळकपणे मांडले. या सादरीकरणांना नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव तेजस्विनी निराळे यांनी उपस्थितांना नशामुक्तीची शपथ दिली. “निरोगी भारत घडवण्यासाठी आपण सर्वांनी पुढाकार घेणे अत्यंत गरजेचे आहे,” असे त्यांनी सांगितले.
तसेच एडवोकेट नेहा राऊत यांनी आपले मनोगत व्यक्त करताना नशेमुळे होणारे शारीरिक, मानसिक, सामाजिक व आर्थिक तोटे सविस्तरपणे समजावून सांगितले.तसेच शासकीय महाविद्यालय च्या अधिष्ठाता डॉ पूर्वा पाटील यांनी मुलाना अमली पदार्था पासुन दुर राहण्याचा संदेश दिला.
रॅलीदरम्यान विद्यार्थ्यांनी व सहभागी नागरिकांनी मादक द्रव्याची गोळी , करी जीवनाची होळी.
“नशा नाही – निरोगी आयुष्य हवे”
अशा जोरदार नशाविरोधी घोषणा देत जनजागृती केली. या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांना अल्पोपहाराची व्यवस्था लायन्स क्लब श्रीबाग, हॉटेल गुरुप्रसाद अलिबाग यांनी केली होती.
या रॅली व कार्यक्रमांना एकूण ३५९ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त उपस्थिती दर्शवली. तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते सुशील साईकर यांचा विशेष सहभाग लाभला. अमली पदार्थमुक्त भारताच्या दिशेने अलिबागमध्ये राबविण्यात आलेला हा उपक्रम समाजात सकारात्मक संदेश देणारा ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *