क्षयरुग्णांना पोषण आहार वाटप;निक्षय मित्र महानगर गॅस कंपनीचा सामाजिक पुढाकार

अलिबाग(रत्नाकर पाटील)

क्षयरोगमुक्त रायगड जिल्ह्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत महानगर गॅस लिमिटेडने मुंबई यांनी आपल्या सामाजिक बांधिलकीतून 550 क्षयरुग्णांना 3 हजार 300 पोषण आहार फूड बास्केटचे वितरण मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्या हस्ते जिल्हा परिषद येथे करण्यात आले.
जिल्हाधिकारी किशन जावळे व राजिप मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी कॉर्पोरेट क्षेत्रातील कंपन्याना निक्षय मित्र बनवून त्यांना फूड बास्केट देण्यासाठीचे आवाहन केले होते. त्यास प्रतिसाद देत महानगर गॅस लिमिटेड मुंबईने पुढाकार घेतला. पोषणयुक्त आहारामुळे क्षयरोगाच्या रुग्णांना उपचारादरम्यान आवश्यक ऊर्जा व प्रतिकारशक्ती मिळते, ज्यामुळे रोगमुक्तीची प्रक्रिया अधिक प्रभावी ठरते. महानगर गॅस लिमिटेडने या उपक्रमातून सामाजिक जबाबदारीची जाणीव दाखवत रुग्णांच्या आरोग्य संवर्धनासाठी मोलाचे योगदान दिले आहे.
या कार्यक्रमास जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.प्राची नेहूलकर, महानगर गॅस लिमिटेडचे सहाय्यक उपाध्यक्ष (मानव संसाधन) संकेत धोत्रे, मुख्य व्यवस्थापक सुसंता कुमार राउत, सहाय्यक व्यवस्थापक प्रियांका दळवी यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

क्षयरोगमुक्त रायगड जिल्हा घडवण्यासाठी केवळ शासनाचेच नव्हे तर कॉर्पोरेट क्षेत्राचेही योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. अधिकाधिक कंपन्यांनी ‘निक्षय मित्र’ बनून क्षयरुग्णांच्या उपचार व पोषण आहारासाठी पुढे यावे.
– नेहा भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी, रायगड जिल्हा परिषद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *