महासंघ क्रिकेट चषक २०२६ : जळगाव संघाचा विजयी चौकार

अमळनेर | सत्तार खान

महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघातर्फे आयोजित जिल्हास्तरीय “महासंघ क्रिकेट चषक २०२६” स्पर्धा अमळनेर येथील क्रीडा संकुलाच्या मैदानावर १० व ११ जानेवारी दरम्यान उत्साहात पार पडली. अंतिम सामन्यात चाळीसगाव संघावर मात करत जळगाव संघाने विजेतेपदावर आपले नाव कोरले.

या स्पर्धेत अमळनेर अ, अमळनेर ब, पारोळा, पाचोरा-भडगाव, चाळीसगाव, चोपडा, जळगाव, भुसावळ, यावल आणि जामनेर-बोदवड अशा दहा संघांनी सहभाग घेतला. अंतिम सामन्यात जळगाव संघाचा रोहित बोरसे याने मॅन ऑफ द मॅचचा बहुमान पटकावला. मालिकावीर ठरला चाळीसगाव संघाचा अष्टपैलू मोईज शेख. उत्कृष्ट गोलंदाज म्हणून जळगाव संघाचा रोहित बोरसे, तर उत्कृष्ट फलंदाज म्हणून अमळनेर ब संघाचा अंकित पाटील यांना गौरविण्यात आले.

स्पर्धेचे उद्घाटन आमदार अनिलदादा पाटील यांच्या हस्ते झाले. बक्षीस वितरण समारंभात हेमाकांत पाटील व पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या हस्ते विजेत्या संघ व खेळाडूंना गौरविण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर, उपनगराध्यक्ष प्रशांत निकम, बाजार समिती सभापती अशोक पाटील, तसेच महासंघाचे हेमंतकुमार पाटील, शरद पाटील, मनोहर पाटील, नितीन लाड, नाना पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

शिक्षक महासंघाचे अतुल चौधरी, गणेश लोळते, स्वप्नील पाटील, आशिष चौधरी, महेंद्र रामोशे यांच्यासह अमळनेर शहरातील खाजगी प्राथमिक शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने ही स्पर्धा अत्यंत शिस्तबद्ध व नियोजनबद्ध पद्धतीने पार पडली. या यशस्वी आयोजनाबद्दल राज्य पदाधिकाऱ्यांनी अमळनेर तालुका खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघाचे विशेष कौतुक केले.

स्पर्धेदरम्यान संपूर्ण वातावरण उत्साहपूर्ण, संघभावना आणि खिलाडूवृत्तीने भरलेले होते. या निमित्ताने अमळनेर परिसरात महासंघमय वातावरण अनुभवायला मिळाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *