उषःकाल फाउंडेशन तर्फे माणगांव तालुक्यात मोफत आरोग्य तपासणी शिबिर यशस्वी

२०५ नागरिकांनी घेतला लाभ; ७१ मोफत चष्म्यांचे वाटप

माणगांव तालुक्यातील वारक येथे उषःकाल फाउंडेशन आणि तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेंटर, नेरूळ–नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेले मोफत आरोग्य तपासणी शिबिर यशस्वीपणे पार पडले.

मंगळवार, ०६ जानेवारी २०२६ रोजी रा.जि.प. प्राथमिक शाळा, वारक येथे सकाळी १०.३० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत हे शिबिर घेण्यात आले. या शिबिराचा एकूण २०५ नागरिकांनी लाभ घेतला.

शिबिरात १६० जणांची नेत्र तपासणी करण्यात आली असून त्यामधून गरजू नागरिकांना ७१ मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले. तसेच ९० नागरिकांची हृदयाची ई.सी.जी. तपासणी करण्यात आली. यासोबतच रक्तदाब, शुगर तपासणी, फुफ्फुस तपासणी, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला आणि गरजूंना मोफत औषधांचे वाटप करण्यात आले.

या शिबिरामार्फत महात्मा ज्योतिराव फुले आयुष्यमान भारत योजना तसेच तेरणा चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून हृदयविकार, डोळ्यांचे विकार, किडनी, कॅन्सर, हाडांचे आजार, स्त्रीरोग, बालरोग, जनरल सर्जरी आदी आजारांवरील उपचार व शस्त्रक्रिया अत्यल्प दरात उपलब्ध करून देण्याबाबत नागरिकांना माहिती देण्यात आली.

या आरोग्य शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शिबिर यशस्वी पार पाडण्यासाठी तेरणा हॉस्पिटलच्या डॉक्टर व वैद्यकीय पथकाने विशेष मेहनत घेतली. माणगांव तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्यासाठी भविष्यातही असे उपक्रम राबविण्यात येतील, अशी ग्वाही उषःकाल फाउंडेशनचे संस्थापक नामदेव शिंदे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *