वावळोली ते पाली रस्त्यावर खडीचा सडा; अपघाताचा धोका वाढला – नागरिकांमध्ये संताप

सुधागड-पाली (प्रतिनिधी): वावळोली ते पाली या मुख्य मार्गावर मोठ्या प्रमाणात खडी सांडल्यामुळे वाहनचालकांसमोर गंभीर अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. खडीने भरून आलेल्या डंपरमधून क्षमतेपेक्षा अधिक खडी वाहून नेली जात असल्याने ती रस्त्यावर सांडत आहे. परिणामी, संपूर्ण रस्ता खड्यांनी भरून गेला असून, विशेषतः दुचाकीस्वारांसाठी ही परिस्थिती अत्यंत धोकादायक ठरत आहे.

सध्या हिवाळ्याचे दिवस असल्यामुळे सकाळच्या वेळेस धुका असतो असतो अशा स्थितीत रस्त्यावर सांडलेली खडी घसरुन अपघात होण्याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही. वावळोली दुचाकीस्वारांचे नियंत्रण सुटून अपघात झाल असल्याचे प्रकार समोर येत आहेत. या घटनेमुळे वावळोली, पाली आणि परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

या निष्काळजीपणामुळे जर एखाद्याचा जीव गेला किंवा गंभीर दुखापत झाली, तर त्याची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. ओव्हरलोड वाहतूक आणि अपुऱ्या झाकणाच्या डंपरमुळे खडी सांडण्याचे प्रमाण वाढले असून, याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.

याबाबत प्रशासनाने तातडीने लक्ष घालून संबंधित डंपर मालक, चालक तसेच दगड खाण मालक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी प्रवासी वर्ग, स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे. तसेच, वाहतूक विभागाने ओव्हरलोड वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तपासणी मोहीम राबवावी, अशीही मागणी जोर धरू लागली आहे.

पाली नगरपंचायत, पोलीस प्रशासन आणि महसुल विभाग यांनी संयुक्तपणे कारवाई करून वावलोली ते पाली रस्त्यावरील खडी तातडीने हटवावी, अन्यथा संभाव्य अपघातांना जबाबदार कोण, हा प्रश्न अनुत्तरितच राहील. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ही बाब अत्यंत गंभीर असून, प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेणे आवश्यक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *